Pune Bar Association – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीची तारीख बदलली आहे. ६ फेब्रुवारीऐवजी आता ४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते, तर पुणे बार असोसिएशनची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूमुळे ३ दिवस दुखवटा जाहीर करण्या्त आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन ९ तारखेला मतमोजणी होणार आहे. अनेक वकील ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे त्यांना मतदानास जाण्यास त्रास होऊ नये, ते मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने पुणे बार असोसिएशन निवडणुकीच्या दिवसात बदल करण्यात आल्याची माहिती अॅड. परदेशी यांनी दिली. महिला आरक्षण दिल्यानंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि हिशोब तपासणीस पदासाठीही मतदान होणार आहे. १५ कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. “जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळे पुणे बार असोसिएशन निवडणुकीची तारीख बदलली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने हा निर्णय घेण्यात आला आहे.” – अॅड. प्रताप परदेशी,मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शाई लावणार पण दुसऱ्या बोटाला पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मतदार वकिलांच्या हाताला शाई लावली जाते. त्यानंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान आहे. या निवडणुकीतही वकिलांना मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात येत आहे. शाई लावली जाणार आहे. मात्र, ती दुसऱ्या बोटाला लावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.