Pune Bangalore Highway – पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर लिंब खिंड ते पाचवडसह पुढे खंबाटकी बोगद्यापर्यंत अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला होता. वाहनधारकांना होणार्या त्रासाबाबतचे वृत्त दै. ‘प्रभात’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर त्याची दखल घेत संबंधित यंत्रणा व ठेकेदार जागे झाली. बुधवारी रस्त्याच्या डांबरीकरण करण्याचे काम सुरु आले आहे. यामुळे नागरिकांकडून दै. ‘प्रभात’ धन्यवाद देण्यात येत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडलेल्या स्थितीत होता. त्यावरुनच मोठी वाहने भरधाव वेगाने जात होती. तर दुचाकी चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. या महामार्गावरील काही ठिकाणी रस्ता उखडून ठेवण्यात आला होता. मात्र अनेक दिवस उलटूनही काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे वाहनांचा तोल जात असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली होती. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. या समस्येबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत वाहनधारक, नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर दै.‘प्रभात’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बुधवारी दिवसभर कामगार आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु होते. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या महामार्गावर वेळेत काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनानेही या कामावर लक्ष ठेवून ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.