Pune : भाडे तत्त्वार घेतलेली इनोव्हा परत ‘न’ दिल्याप्रकरणात जामीन फेटाळला

पुणे – भाडे तत्त्वावर घेतलेली इनोव्हा गाडी अवैधपणे दारू वाहतुकीसाठी वापरून गाडी आणि भाड्याची रक्कम परत न देता फसवणूक केल्या प्रकरणात एकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी.आगरवाल यांनी फेटाळला.
अयान ऊर्फ राहुल ऊर्फ ऍन्थोनी पॉल छेत्तीयार (वय 38, रा.मुंबई) असे त्याचे नाव आहे. टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या श्रीधर जगताप यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. छेत्तीयार याच्यासह अन्य चौघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. फिर्यादींकडून 24 जून 2020 इनोव्हा कार या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीने नेली.
करारात ठरल्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्याला गाडी भाड्याने दिली नाही. याऊलट दारूच्या वाहतुकीसाठी गाडी देऊन भाडे आणि गाडी परत दिलीच नाही. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या छेत्तीयार याने जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या गुन्ह्यातील आरोपींक़डून तब्बल 77 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
त्याच्यावर नेरूळ आणि ओशिवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे गुन्हा करण्याची, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची अथवा परागंदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. पाठक यांनी केली.





