पुणे(प्रतिनिधी) – एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करून, परस्पर सहा कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याप्रकरणी संदीप उत्तमराव भोंडवे आणि विकास दामोदर भोंडवे या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी जामीन मंजुर केला.
या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचा माजी सभापती मंगलदास बांदल, संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बॅंकेतील एका अधिकाऱ्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत वढू खुर्द येथील 74 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
वढू खुर्द येथे 2013 मध्ये व त्यानंतर वेळोवेळी हा प्रकार घडला आहे. या गुन्ह्यात अटक झाल्यावर संदीप भोंडवे व विकास भोंडवे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षातर्फे ॲड. एस. के. जैन, ॲड. अमोल डांगे, ॲड. महेश बडे, ॲड. अमेय गोऱ्हे यांनी काम पाहिले.
दोन्ही पक्षांमधील वाद दिवाणी पद्धतीचा असून, त्यामध्ये आरोपींना जाणूनबुजून गुंतविण्यात आले आहे. फिर्यादी यांनी प्रथम एका महिलेसोबत आणि त्यानंतर सचिन पलांडेसोबत जमिनीचा करारनामा केला. त्यामध्ये संदीप भोंडवे लाभार्थी नसल्याने त्यांच्यावरील आरोप निराधार ठरतात.
याशिवाय फिर्यादीने स्वत:च शिवाजीराव भोसले बॅंकेत जमिनीचे गहाणखत केल्याचे मंडल अधिकाऱ्यासमोर सांगितले आहे. 2010 मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत 2021 मध्ये फिर्याद देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.