Pune : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्याचा जामीन फेटाळला..

पुणे – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी हा आदेश दिला.
सिमॉन रोमिओ मिरींडा (वय २५, रा. माझीवडा गाव, ठाणे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात मिरींडासह प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय ४१, रा. साकुर्डी, सातारा) आणि समीर भगवान संकपाळ (वय २५, रा. मोप्रे, सातारा) यांना देखील अटक करण्यात आली आहे.
आरोपींना १७ फेब्रुवारीला कोंढव्यामधील गिनी सोसायटीच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून दोन लाख ७८ हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.
मिरींडा याने जामीसाठी केलेल्या अर्जाला सरकारी वकील संजय पवार यांनी विरोध केला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो पुन्हा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे. तसेच तो फरार होवू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला.





