Pune: औंध रुग्णालयातही रक्त नमुने बदलण्याचा प्रयत्न

पुणे – कल्याणीनगरमधील पोर्शे अपघातप्रकरणी ससूनप्रमाणे औंध जिल्हा रुग्णालयातही अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सरकार पक्षाने केला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी पुणे न्यायालयात सादर केले.
याप्रकरणी आरोपींविरोधात बनावट दस्तावेज तयार करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे लागू होत नसल्याने आरोप स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. अपघातानंतर कारचालक, दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशि, मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ससूनमधील डॉ. श्रीहरी हाळनोर, डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, त्यावर बचाव पक्षातर्फे ॲड. सुदीप पासबोला, ॲड. ऋषिकेश गानू आणि ॲड. राजेश काळे यांनी युक्तिवाद केला. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, बनावट दस्तऐवज तयार करण्याचे आरोपदेखील येथे लागू होत नसल्याचा युक्तिवाद ॲड. पासबोला यांनी केला. ॲड. गानू यांनी दस्तऐवज व मूल्यवान रोखाचा दस्तऐवज याची व्याख्या मांडली.
आरोपपत्रात समाविष्ट असलेली कागदपत्रे ही मूल्यवान रोखाचा दस्तऐवज या कक्षेत येत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय दंड विधानातील समान हेतू, गुन्हेगारी कट हे एकत्र लागू होऊ शकत नसल्याचा दावा ॲड. काळे यांनी केला. पुढील सुनावणी ११ जुलैला होणार आहे.





