पुणे: ‘आशा’ वर्कर, गटप्रवर्तक 3 महिन्यांपासून वेतनाविना

पुणे – ग्रामीण भागातील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या “आशा’ वर्कर आणि गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांपासूनचे मानधन झालेले नाही. त्यामुळे हे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कर्मचारी आता मात्र आर्थिक अडचणीत आल्या आहेत.
करोना काळात याच आशा वर्करने जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तरीही त्यांना मानधनापासून वंचित रहावे लागते, त्यामुळे त्यांचे मानधन तात्काळ द्यावे, अशी मागणी राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात सुमारे 3 हजारांपेक्षा अधिक आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आहेत. त्यांच्याकडून आरोग्य सेवेसंबंधी कामे करुन घेतले जातात. त्यांना मानधन दिले जाते. तसेच लसीकरणासाठी प्रत्येक दिवशी 200 रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु अद्याप नियमित आणि वाढीव मानधनही देण्यात आलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, असा आरोप राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव श्रीमंत घोडके यांनी केला आहे.
आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचे मानधन देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. जानेवारी अखेरपर्यंचे मानधन दोन दिवसांत बॅंक खात्यात जमा होईल. तसेच कोविड लसीकरणाचे मानधन सप्टेंबर अखेपर्यंतचे जमा केले आहे. उर्वरित मानधन शासनाकडून आदेश आल्यानंतर जमा केले जातील.
– डॉ. भगवान पवार,जिल्हा आरोग्य अधिकारीया




