Pune : हापुस हंगामाआधीच गावरान केशरची आवक

पुणे : कोकणातील हापुस आंब्याचा हंगाम बहरात आल्यानंतर गावरान केशरची आवक होते. मात्र, यंदा ही आधीच झाली आहे.
गोड चवीच्या गावरान केशरची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत १५ ते २० दिवस आधीच ही आवक झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील शेतकरी नागेश नागपुरे आणि प्रमोद पवार यांच्या शेतातून ४० कॅरेटची ही आवक झाली आहे.
या मालाला बुधवारी (दि.९) लिलावात किलोस १६० रुपये भाव मिळाला. एका कॅरेटमध्ये १८ ते २० किलो माल असतो. सुधीर मनसुख आणि अनुप काची यांनी लिलावात या आंब्याची खरेदी केली. हंगामाच्या सुरूवातील मागील वर्षीच्या तुलनेत जास्त भाव मिळाला असून, मागील वर्षी किलोला १०० रुपये भाव मिळाला होता.
कोकण, कर्नाटकातील हापूस प्रमाणे या आंब्यालाही हवामान बदलाचा फटका बसला आहे. अति उष्णतेमुळे मोहोर गळाला आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ६० टक्केच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या आब्यांचा हंगाम मात्र नेहमीप्रमाणे १५ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे शेतकरी नागेश नागपुरे आणि प्रमोद पवार यांनी सांगितले.
गावरान केशरची आवक सुरू झाली आहे. आता आवक वाढणार आहे. यंदा कोकण, कर्नाटक हापूसला हा आंबा स्पर्धा देणार आहे. कोकणच्या तुलनेतच यंदा या आंब्याला भाव मिळाला आहे.
– युवराज काची, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड




