Pune News : पुण्यात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात साजरी झाली अनोखी ‘व्यसनमुक्ती दहीहंडी’
Pune News : ‘गोविंदा आला रे...’च्या जयघोषात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, पुण्यात मात्र सामाजिक भान जपणारी एक अत्यंत आगळी-वेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली.

Pune News : ‘गोविंदा आला रे…’च्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा होत असतानाच पुण्यात यंदा व्यसनमुक्तीचा संदेश देणारी आगळी-वेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली. नशामुक्त अभियानांतर्गत आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या वतीने ‘व्यसनमुक्ती दहीहंडी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)
या वेळी दहीहंडी फोडण्यासाठी उपचारासाठी केंद्रात दाखल असलेल्या ५८ बांधवांनी मानवी मनोरे रचले. हंडी फोडण्यापूर्वी त्यांनी ‘आम्ही व्यसनमुक्त होणार, दुसऱ्यालाही व्यसनमुक्त करणार’ अशी सामूहिक शपथ घेतली. हंडीमध्ये दही-लोण्यासोबत व्यसनाच्या वाईट सवयींचे प्रतीकात्मक फलक ठेवण्यात आले होते. हंडी फोडून या वाईट सवयींचा त्याग करण्याचा संदेश देण्यात आला. (Pune News)
या उपक्रमात केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, प्रकल्प व्यवस्थापक निलेश शिंदे, समुपदेशक ऋषिकेश इंगळे, अवधुत पटवर्धन, सामाजिक कार्यकर्ते व सहकारी विशाल शिंदे, धैर्यशील हुलगे, स्वप्नील तांबे, रोझी चॅडी तसेच उपचार घेत असलेले ५८ बांधव सहभागी झाले होते. (Pune News)
यावेळी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य, जनजागृतीपर गीते तसेच व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या माजी व्यसनी बांधवांचे मनोगत सादर करण्यात आले. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. (Pune News)
डॉ. अजय दुधाने म्हणाले, “सणांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा आमचा उद्देश आहे. श्रीकृष्णाने जसा अन्यायाचा नाश केला, तसाच आपण व्यसनाचा नाश करूया. तरुण पिढीने दहीहंडीचा आनंद घ्यावा; मात्र व्यसनापासून दूर राहावे.” (Pune News)
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या या उपक्रमातून पारंपरिक सणाला सामाजिक संदेशाची जोड देत ‘व्यसनाला फोडा, आयुष्याला जोडा’ असा संदेश देण्यात आला. (Pune News)





