पुणे – वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केला. पठारे यांच्या या विजयात आंबेडकरी चळवळीची भूमिका “जायंट किलर’ ठरली आहे. महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) शेकडो पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राजीनामे देत सुनील टिंगरे यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका टिंगरे यांना बसल्याचे बोलले जात आहे.राज्यभरात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे नाराज होऊन पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याचे समर्थन करीत महापालिकेतील माजी गटनेत्या फरझान अय्युब शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत महायुतीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. या भागात आंबेडकरी चळवळीशी संबंधित मतदारांची मोठी संख्या आहे. धेंडे व सहकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे ही सर्व ताकद पठारे यांच्या पाठीशी गेल्याने टिंगरे यांना फटका बसल्याचे सांगितले जात आहे. “गेल्या अनेक वर्षांत महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी रिपाइंला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यामुळे अनेकांनी प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजीचा मोठा सूर होता. त्याचा परिणाम वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसला. या मतदारसंघात महायुतीला पराभवाचा फटका बसला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयात आंबेडकरी अनुयायी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भूमिका “जायंट किलर’ ठरली आहे,’ अशी माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली आहे.