प्रभात वृत्तसेवा पुणे – भारतीय विमानतळ प्राधिकरण व एसीआय-एएसक्यू’ (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) यांनी एप्रिल ते जून दरम्यान केलेला सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये सेवा गुणवत्ता निर्देशांकात मागील तीन महिन्यांपूर्वी ५९ व्या स्थानावर असलेले पुणे विमानतळ ५७ व्या स्थानी पोहोचले आहे. लोहगाव पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल सुरू झाले. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली, तसेच विमान उड्डाणांची संख्याही वाढली. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये विमानतळावर सुधारणा होत असून, त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर आधारित हे सर्वेक्षण होते. सर्वेक्षणात स्वच्छतागृहाची स्थिती, गेटवर लागणारा वेळ, विमान, रेस्टाॅरंट आणि शाॅपिंग माॅलमधील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, टर्मिनलमधील स्वच्छता, चेक इन व सिक्युरिटी काउंटरमध्ये प्रवाशांना मिळणारी सेवा यांसह अन्य २६ निकषांद्वारे गुणवत्ता तपासली जाते. प्रवाशांची मते जाणून घेतली जातात. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेंबाबत सुधारणा झाल्याने सेवा गुणवत्तेत विमानतळाने ५७ वे स्थान मिळवले. “हवाई प्रवाशांंना आलेला अनुभव हा त्यांना मिळालेल्या सेवेने संस्मरणीय ठरतो. यासाठी एअरलाइन्स, विमानतळावरील इतर यंत्रणांनी तत्पर, सौजन्यशील व कार्यक्षम सेवा देणे आवश्यक आहे. बहुतेक सेवा निकषांवर पुणे विमानतळाने उल्लेखनीय कामगिरी केल्याची बाब दिलासादायक आहे”. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ