Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ

पुणे : विमानतळाकडे जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आमदार सुनील टिंगरे ( MLA Sunil Tingre ) यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन्ही रस्त्यासाठी मिळून महापालिका 21 कोटी रुपये खर्च करणार आहे.यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धारव, अधीक्षक अभियंता मीरा सबनीस, उपअभियंता रोहिदास देवडे, प्रभारी उपअभियंता दत्तात्रय तांबारे, शाखा अभियंता सपना सहारे, यासह सुहास टिंगरे, रवी टिंगरे, श्याम आढाव उपस्थित होते.
या बाबत बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, फाइव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण असून तो मागील पावसाळ्यात उखडला होता. हाच रस्ता आता सिमेंट कॉंक्रीट चा होणार आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ देखील करण्यात येणार आहेत. याचबरोबर फाईव्ह नाईन चौकाजवळील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत होती, हा रस्ता देखील विमानतळापासून ते थेट जेल रोड पोलीस चौकी पर्यंत डांबरीकरणाचा बनविण्यात येणार आहे.
यामध्ये रुंदीकरण ही करण्यात येणार असून फाईव्ह नाईन चौक हा मोठा चौक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी त्याच बरोबर या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव म्हणाले, दोन्ही रस्त्यासाठी 21 कोटी रुपये निधी उपलब्ध असून. येत्या सहा महिन्यात हे दोन्ही रस्ते पूर्ण केले जातील. रस्ता करण्यासाठी बाधित होणारी झाडे देखील परवानगी घेऊन तोडण्यात येतील.





