Pune : एअरफोर्स कडून इंदिरानगरला नोटीस; वसाहतीमधील ५६५ घरे बाधित असल्याचे सर्व्हेमध्ये नमूद

विश्रांतवाडी – लोहगाव विमानतळाजवळील इंदिरानगरमधील ३०० झोपडपट्टीधारकांना एअर फोर्स स्टेशनने तुम्हाला बेदखल का करण्यात येऊ नये?, अशी नोटिस पाठविली आहे. खुलासा सादर करण्यात यावा, असेही नोटीस मध्ये नमूद केलेले आहे. आपली झोपडी वजा घरे जाणार, यामुळे सुमारे ५५० कुटुंब भीतीच्या छायेत आहेत.
एअर फोर्स स्टेशनच्या जागेत सर्व्हे नंबर २४२ याठिकाणी सुमारे ६ एकर जागेवर ११०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. १९८० पासून ही कुटुंबे येथे राहतात. पूर्वी केंद्रीय विद्यालय-२ जवळ वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबांना तेथून जागा सोडण्याचे आदेश एअर फोर्सने दिले होते.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पुणे विमानतळावर आल्या असता त्यावेळी माजी नगरसेवक शरद रणपिसे, मरीअप्पा चलवादी, तात्या ओव्हाळ, गणपत धोत्रे यासह सर्व रहिवाशांनी इंदिरा गांधी यांच्याकडे आपली कैफियत मांडली. यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्तांना इंदिरा गांधी यांनी पुनर्वसनाच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेने पुनर्वसन केले, त्यामुळे ही वस्ती इंदिरा नगर या नावाने ओळखली जाते.
दरम्यान, एअर फोर्स स्टेशनने केलेल्या सर्व्हेमध्ये इंदिरा नगर वसाहतीमधील ५६५ घरे बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एअर फोर्स स्टेशनने येथील झोपडी वजा घरास १४ जुलैपासून नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. एअर फोर्स प्रशासनाला लेखी खुलाशासह पुरावे सादर करावेत, अशा सूचनाही एअर कमांडर यांनी दिलेल्या आहेत. याबाबत माजी आमदार सुनील टिंगरे, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी यासह इंदिरानगर बचाव कृती समितीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच एअरपोर्ट स्टेशनला निवेदन दिले आहे.
एअर फोर्सने नोटीसा दिल्या असल्या तरी पालिका प्रशासनाशी चर्चा केल्याशिवाय कारवाई करता येणार नाही. इंदिरानगर परिसराची पाहणी केली असून नागरिकांनी घाबरू नये. – नवल किशोर राम, महापालिका आयुक्त
घरे झाल्यानंतर एअर फोर्सने महापालिकेला सहा एकर जागा ताब्यात घेण्यास सांगितले होते. सहा एकर जागेच्या रेडी रेकनरनुसार २५ टक्के रक्कम एअरफोर्सला जमा करा, असे पत्रही पालिकेला दिले होते. मात्र, पालिकेने १८ वर्षे झाली काहीच हालचाल केली नसल्याने रहिवाशांना नोटीसा देण्यात येत आहेत. आता, तरी पालिकेने सहा एकर जागेचे पैसे एअर फोर्सला द्यावे, अशा प्रकारचे निवेदन कृती समितीच्या वतीने आयुक्तांना दिले आहे. – विजय चौगुले, इंदिरानगर बचाव कृती समिती.





