पुणे – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी मार्गस्थ होतात. यंदा वारीच्या नियोजनात तंत्रज्ञानाची भर पडली असून पुणे पोलिसांनी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून गर्दीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण केले. एआयच्या मदतीने केलेल्या गणनेनुसार, पुण्यात दोन्ही पालख्यांसोबत एकूण ४ लाख ९० हजार वारकरी दाखल झाले होते. यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत १.९५ लाख वारकरी आणि ६०० वाहने, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत २.९५ लाख वारकरी आणि १८०० वाहने असल्याची नोंद झाली आहे. पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी पारंपरिक बंदोबस्तासोबतच, स्मार्ट एआय कॅमेरे आणि विशेष सॉफ्टवेअर वापरून विविध ठिकाणी वारकऱ्यांची अचूक माहिती गोळा केली. ही नवी प्रणाली वाहतूक नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली असून, यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित झाल्याचा सकारात्मक अनुभव प्रशासनाने नमूद केला आहे. वारी घाटातून दोन तास अगोदर उतरली… दिवे घाटात रस्त्याच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात आले होते. यामुळे दरड कोसळण्याची शक्यता होती.त्यामुळे डोंगरावर उभे रहाण्यास बंदी घातली होती. यासाठी घाटाच्या सुरवातीपासूनच बॅरिकेटस लावले होते. ध्वनिवर्धकावरुन तशा सूचना देण्यात येत होत्या. एक पोलीस उपायुक्त तेथे नियुक्तच होते. तसेच, पुढचा रस्ता वाहनांना बंदी घालून वारीला मोकळा करुन दिला होता. यामुळे मागील वर्षापेक्षा दोन तास लवकर वारी घाटातून पाय उतार झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.