Pune : बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून वेळेत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने केले आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे.
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. सध्या विविध क्षेत्रामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे.
सरकारी, खासगी सर्वच क्षेत्रांत पारदर्शकता, डेटा सुरक्षेसाठी या तंत्रज्ञानाला सक्षम पर्याय म्हणून पाहिले जात आहे. जगभरात डेटा सिक्युरिटीसाठी वाढत असलेली ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
दरम्यान, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सध्या डिजिटल युगातील एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे, जे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहे. ब्लॉकचेनच्या उपयोगामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात त्याची गरज वाढत आहे, असे विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.
हे तंत्रज्ञान सध्याच्या आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अनेक समस्यांवर उत्तर असून, सुरक्षितता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याची स्वीकारार्हता सतत वाढत आहे.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ




