Pune : राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान

पुणे : महिलांसबलीकरणाबाबतच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी २०२५-२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे महिलांच्या विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे.
शासनाच्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलांपर्यंत पोहचविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. अभियानासाठी गाव, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. ग्रामस्तरावरील उत्कृष्ट कामाची तपासणी करण्यासाठी मुल्यमापनाचे निकषही ठरविले आहेत. आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या पहिल्या तीन ग्रामंपचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे.
अभियान व पुरस्कारासाठी अंदाजे १० कोटी ५० लाख इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात येईल. ग्रामपंचायतीने पुररकाराची रक्कम महिला व बाल विकास कामांवर खर्च करावी लागणार आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीतील कामांचे मुल्यांकन फेब्रुवारीअखेर पूर्ण होईल आणि पुरस्कार वितरण मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल.
आदिशक्ती अभियानाचा उद्देश
ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे, त्यांच्या आरोग्य समस्यांचे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सक्षम समाज निर्माण करणे, लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाहाला रोखणे, लैंगिक, शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध, महिला नेतृत्व सक्षम करून पंचायत राज पध्दतीमध्ये सहभाग वाढविणे, महिला, किशोरींना शिक्षण, रोजगार, निर्णयात समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्या माध्यमातून आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबविणे.




