PUNE: कात्रजमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

कात्रज – कात्रज आगम मंदिर परिसरात अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामावर पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन-२च्या वतीने नोटीस बजावण्यात आले, मात्र तरीही कामे सुरूच ठेवल्याने १६ हजार चौरस फूट क्षेत्रावर धडक कारवाई करण्यात आली, त्यामुळे अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता प्रवीण भावसार व शाखा अभियंता प्रशांत मोरे, अभिजित भुजबळ यांच्या पथकाने सच्चाई माता मंदिर भागात असलेल्या सर्वे नंबर ६६ मध्ये जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षित जागेवर अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामावर दोन जेसीबी, तीन ब्रेकर, दोन गॅस कटर व कर्मचारी यांच्या साहाय्याने मोठी कारवाई करण्यात आली.
(बिडीपी) जैवविविधता उद्यान आरक्षित जागेत अनधिकृत प्लॉटिंग करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते, अशा ठिकाणी प्लॉटिंग घेऊ नये तसेच पालिकेची परवानगी न घेता बांधकामे करू नयेत यापुढेही नियमितपणे कारवाई होईल, असे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.





