Pune: पीयूसी नसल्यास कारवाई; मागील नऊ महिन्यांत पाच हजार वाहनांना दंड

पुणे – रस्त्यावर चालवत असलेल्या वाहनांमुळे प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषण होत नाही ना, यासाठी वेळोवेळी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीओकडूनही वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे अनिवार्य केले आहे. मात्र, अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी प्रदूषण वाढते. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पीयूसी नसलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
गेल्या नऊ महिन्यांत १४ हजार वाहनांची तपासणी करून साडेचार हजार वाहनांवर प्रत्यक्षात कारवाई केली. त्यातून सुमारे ६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. परिणामी, हवेच्या प्रदूषणाचा स्तर वाढत जातो. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी आरटीओकडून पीयूसी नसलेल्या वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात आरटीओच्या वायूवेग पथकाने ५ हजार ३२३ वाहनांची तपासणी केली होती. यात १ हजार ४६५ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याचे आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तात्काळ आपल्या वाहनांची चाचणी करून पीयूसी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




