Vishal Agarwal : “पप्पा, तुम्ही त्या मुलीची….”; केतन वारंवार वडिलांना ती गोष्ट सांगायचा, विशाल अग्रवाल भावूक
Vishal Agarwal : ज्यामुळे या प्रकरणात पोलीस तपासात आणखी हादरुन टाकणारी माहिती समोर येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vishal Agarwal : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरुन पाय घसरुन केतनचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. हा अपघात नसून घातपात असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या दोघांनी मिळून केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला असा आरोप त्यांच्यावर आहे. आता या प्रकरणी केतनचे वडिल विशाल अग्रवाल माध्यमांसमोर येत त्यांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. ज्यामुळे या प्रकरणात पोलीस तपासात आणखी हादरुन टाकणारी माहिती समोर येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केतन वडिलांना सतत सांगायचा की… (Vishal Agarwal )
फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता. विशेष म्हणजे, लग्नासाठी पुढाकार मुलीच्या कुटुंबीयांनीच घेतला होता. मात्र साखरपुड्यानंतर केतन वारंवार सियाच्या वागणुकीबाबत शंका व्यक्त करत होता. “पप्पा, तुम्ही त्या मुलीची चौकशी केली आहे का? ती सतत किरकोळ कारणांवरून भांडते,” असे केतन मला सांगायचा. मात्र नात्यातील लोक असल्याने आणि मुलीच्या कुटुंबीयांनी विश्वास दिल्याने आम्ही त्याच्या शंकांकडे गांभीर्याने पाहिले नाही, असे केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांनी सांगितलं.
त्या दिवशी घराबाहेर पडला आणि…. (Vishal Agarwal )
विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, सिया वारंवार लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट धरत होती. दोन वेळा तिथे जाऊन आल्यानंतरही तिने पुन्हा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तिसऱ्यांदा लोहगडवर जाण्याचा आग्रह धरला. अखेर 18 जून रोजी सकाळी केतन घरातून निघाला आणि काही तासांतच त्याच्या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली. या घटनेची माहिती ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
हेही वाचा : Trisha Krishnan: ‘तुझ्यामुळे सगळं खास वाटतं’… तृषाच्या पोस्टनंतर विजयसोबतच्या नात्याची पुन्हा चर्चा
विशाल अग्रवाल भावूक
आमच्या काही लक्षातच येत नव्हतं, इतका शार्प मुलगा, असा कसा काय पडू शकतो किल्ल्यावरून, पडायचं काही कारणच नाही. आम्ही तिथे जाऊन दोन-तीन दिवसांनंतर पाहणी केली. तर आमच्या लक्षात आलं. तो तिथून पडू शकत नाही, अशी शंका विशाल अग्रवाल यांना आली होती. त्यानंतर तपासात सिया आणि तिचा मित्र चेतन यांचं बिंग फुटलं. तिने त्या पोराला अठरा तारखेला गडावर बोलावलं आणि त्याला सांगितलं आमच्या केतनला धक्का मार, त्या दोघांनी मिळून माझ्या केतनला धक्का मारला, असा दावा करत न्याय मिळाला अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केली. यावेळी ते भावूक झाले होते.
प्रेमसंबंधात अडथळा ठरला अन्…
पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. केतन हा त्यांच्या नात्यातील अडथळा ठरत असल्याने त्याला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






