Ketan Agrawal death case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयलच्या मित्राच्या वकिलांचा धक्कादायक दावा
Ketan Agrawal death case : केतनला दरीत ढकलून देण्यात आल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Ketan Agrawal death case : १८ जून या दिवशी पुण्यातील केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून झालेला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेत तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे.
केतनला दरीत ढकलून देण्यात आल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची राज्यभरात चर्चा असून मोठी खळबळ उडाली आहे.
सियाच्या मित्राच्या वकिलांचा खळबळजनक दावा
मात्र, या प्रकरणात आता बचाव पक्षाकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे. आरोपी चेतन चौधरी याचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात सांगितले की, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचे लग्न ठरले होते आणि दोघांमध्ये चांगले संबंध होते. लोहगड किल्ल्यावर फिरत असताना केतनचा तोल जाऊन तो दरीत कोसळला असून ही घटना अपघात असल्याचा दावा त्यांनी आहे. तसेच केतनच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींविरोधात मागितलेली सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जाणार आहे.
हेही वाचा : Pune District : कासारीत पाण्यासाठी हंडा मोर्चा; संतप्त ग्रामस्थ, महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
मयत केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला ही घटना केवळ अपघात वाटत असल्याचे दिसत होते. मात्र, पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांही मिळून केतनच्या हत्येचा कट रचून त्याला संपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
लग्नाची जय्यत तयारी
केतनचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या घराच्यांकडून लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. अवघ्या दहा दिवसांनंतर जयपूरमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. कुटुंबीयांनी यासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्चून डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन केले होते. यासाठी दोन विमानांचेही बुकिंग करण्यात आली होती. लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच केतन आपल्या होणारी पत्नी सिया गोयलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेला ृआणि तिथेच त्याचा घात झाला.
वारंवार केतनसोबत वाद
केतन आणि सिया यांचे अरेंज मॅरेज ठरले होते. मात्र, कुटुंबीयांच्या दाव्यानुसार सिया या नात्याबाबत समाधानी नव्हती. ती वारंवार केतनसोबत वाद घालत असल्याचेही सांगितले जात आहे. ४ जून रोजी ट्रेकिंगला न आल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केल्याची माहितीही समोर आली आहे. अखेर तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी केतन लोहगडावर गेला, पण तोच दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, या प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Unauthorized Stalls : शाळा परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई






