Pune : कामगाराच्या शरीरात आरपार घुसली सळई

पुणे : एरंडवणा येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक कामगार २० ते २५ फुट उंचावरुन खड्डयात पडला. त्याच्या खांद्याजवळ एक सळई शरीरात आरपार गेली. मात्र, अग्निशामक केंद्राच्या जवानाच्या प्रयत्नांनी त्याला वाचविण्यात यश आले आहे. बुधवारी (दि.५) दुपारी साडेतीनच्य सुमारास एरंडवणा येथील खिल्लारे रस्ता, शारदा सेंटर जवळ ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशाम दलाचे जवान बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तातडीने पोहोचले. तो कामगार पडलेल्या खड्डयात तातडीने शिडी व हायड्रोलिक किटचा वापर करीत जवानांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला धीर दिला. त्याच्या शरिरात घुसलेल्या सळईचा बाहेरचा भाग कापून त्याला खड्ड्यातून बाहेर काढले. त्यावेळी तेथे तातडीने उपस्थित झालेल्या डाॅक्टरांनी त्याच्यावर उपचार करीत त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एरंडवणा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत पोहोचत सुमारे पंधरा मिनिटात कार्यवाही पुर्ण केली. या कामगिरीत वाहनचालक सचिन क्षीरसागर, तांडेल अनंत जाधव व जवान सचिन आयवळे, सागर मुंढे, राहुल वाघमोडे, आशुतोष पिंगळे, निलेश पाटील, कमलेश माने, सुमित कांबळे यांनी सहभाग घेतला.





