Pune : अल्पवयीन वाहनचालकाचा पोलिसांशी उद्दामपणा

पुणे : कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यास अल्पवयीन चालकाने विरोध केला. झटापटीत वाहतूक पोलिसाचा मोबाइल पडल्याने नुकसान झाले. या प्रकणात मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला दुचाकी चालविण्यास दिल्याप्रकरणी वडिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस शिपाई उमेश नरुटे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील नागनाथ पार परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती.
सोमवारी सकाळी अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन निघाला होता. पोलिसांनी त्याला थांबविले. परवान्याबाबत विचारणा केली. तेव्हा मुलाकडे परवाना नसल्याचे आढळून आले.
पोलीस शिपाई नरुटे यांनी मोबाइलवरुन चित्रीकरण केले. तेव्हा मुलाने कारवाईस विरोध केला. झटापटीत नरुटे यांचा मोबाइल रस्त्यावर पडल्याने नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक गणेश फरतडे तपास करत आहेत.




