PUNE: पुणेकरांना रुचकर मेजवानी…

पुणे – खवय्ये पुणेकरांसाठी महापालिकेकडून समाज विकास विभागाच्या बचतगटांंचा खाद्य महोत्सव व साहित्य विक्रीच्या महोत्सवाचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात करण्यात आले आहे. रविवार, दि. २१ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू असेल. यामध्ये १०० हून अधिक बचतगट सहभागी झालेले आहेत. महापालिका आयुक्त आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास, उपायुक्त आशा राऊत, उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, तसेच समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हा खाद्य महोत्सव असणार असून या शिवाय बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टाॅलही या ठिकाणी असणार आहेत. महिला सक्षमीकरणअंतर्गत महिला बचत गटांकरीता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटींगचे नियोजन इ-कॉमर्स चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाइल अॅप्लिकेशन यांचे माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





