PUNE: पालिकेच्या तक्रारीला पोलीस देणार न्याय

पुणे – शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटवताना, अधिकारी आणि कर्मचार्यांना मारहाण-शिविगाळ झाल्यानंतर महापालिकेकडून पोलिसांकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र, यावर पोलिसांकडून गुन्हेच दाखल केले जात नाहीत. त्यामुळे आता हे गुन्हे दाखल करण्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपायुक्तांची नोडल आॅफिसर म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार तसेच वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेकडून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दीडशेहून अधिक तक्रारी देण्यात आल्या. मात्र, गुन्हेच दाखल होत नसल्याने ही संयुक्त बैठक बोलवण्यात आली. त्यानुसार पुढील महिनाभरात किती तक्रारींवर गुन्हे दाखल झाले, याची माहिती संकलित करून उर्वरित प्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
तक्रारी करूनही गुन्हे दाखल होईनात
अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई. आकाशचिन्ह, आरोग्य विभाग, अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी पोलिसात संबंधितांविरोधात तक्रार केली जाते. शिवाय, अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव वाद उद्भवल्यास अधिकार्यांना तसेच कर्मचार्यांना मारहाण केली जाते. यावेळी पालिकेचे कर्मचारी पोलीस ठण्यात गेल्यानंतर त्यांना दिवसभर बसवून ठेवले जाते.
अथवा कागदपत्रांची मागणी करत टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रारी दिल्या असल्या, तरी गुन्हे दाखल झालेले नाहीत. आता हे नोड आॅफिसर महापालिका आणि संबंधित पोलीस ठाण्यात समन्वय अधिकारी असणार आहे.
“शहरात रात्रीच्या वेळी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून संयुक्तपणे कारवाई केली जाणार आहे. पदपथावर अस्वच्छता करणारे, कचरा टाकणारे तसेच महापालिकेच्या मिळकतींचे नुकसान करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.” – विक्रम कुमार, आयुक्त, मनपा





