pune : पीएमआरडीएमधील 74 गावे एमएसआरडीसीकडे?

शासनाच्या नगर विकास विभागाकडे मागणी
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) यापूर्वी रिंगरोड लगतची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) 117 गावांच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर आता पुन्हा प्राधिकरणाकडील 74 गावे देण्यात यावी, अशी मागणी एमएसआरडीसीने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे केली आहे.
नगर विकास विभागाने 2024 मध्ये पुणे रिंगरोडलगतच्या पाच तालुक्यांमधील ११७ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीला मान्यता दिली आहे. या गावांचा विकास आराखडा एमएसआरडीसी तयार करत आहे. अशातच आता या गावांलगतची आणखी 74 गावे प्राधिकरणाच्या हद्दीतून एमएसआरडीसीकडे सोपविण्याची मागणी खुद्द एमआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. तसे पत्र देखील सप्टेंबर 2025 रोजी पाठविले आहे.
या गावांची मागणी करताना एमएसआरडीसीने अनेक कारणे नमूद केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या अधिसूचित केलेले ११७ गावांचे क्षेत्र तीन तुकड्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे नियोजन करताना सलगता राखणे अवघड होत आहे. ७४ नवीन गावांच्या समावेशामुळे हे क्षेत्र एकत्रित होऊन एकात्मिक नियोजन शक्य होईल. सांगरूण (ता. हवेली) आणि किकवी (ता. भोर) यांसारख्या गावांच्या सभोवताली एमएसआरडीसीचे कार्यक्षेत्र निर्माण झाले असून, ही गावे बेटसदृश झाली आहेत. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
यासह पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे रिंगरोड अत्यंत जवळ आहे. सोनोरी (ता. पुरंदर) येथे रिंगरोड रस्त्याचा इंटरसेक्शन नियोजित आहे. विमानतळावरून येणारी वाहतूक याच रस्त्यांवर येणार असल्याने, या नजीकच्या ७४ गावांचा नियोजनबद्ध विकास करणे अत्यावश्यक आहे, तसेच देवडी, ता. पुरंदर येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी त्यांच्या गावाचा समावेश करण्याची मागणी एमएसआरडीसीने केली आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीच्या विशेष नियोजन क्षेत्राचा आकार ६६८ चौ.कि.मी. वरून अंदाजे १०६२.०७ चौ.कि.मी. इतका वाढणार आहे.
प्रस्तावित समाविष्ट गावांची यादी
-भोर तालुक्यामधील किकवी, ससेवाडी, शिंदेवाडी, कासुर्डी, शिवरे, वेळू, हरिश्चंद्री, कापूरहोळ, दिवळे, कामथडी, केलावाडे, नसरापूर, नायगाव, वर्वे बुद्रुक, वर्वे खुर्द.
-हवेली तालुक्यामधील कोंढणपूर, सांगरुण, आर्वी, गाऊडदरा, कल्याण, तानाजीनगर, मोरदरवाडी, अवसरे, रहाटवडे, शिवपूर, खेड शिवापूर, रामनगर.
– मुळशी तालुक्यातील अंबडवेट, भरे, कासार आंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भुकुम, पिरंगुट, आंबेगाव, पौड.
– पुरंदर तालुक्यामधील दिवे, पवारवाडी, जाधववाडी, केतकावळे, चिव्हेवादी, देवडी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, काळेवाडी, सोनोरी, सिंगापूर, झेंडेवाडी, गुन्होळी, आंबोडी.
– राजगड तालुक्यामधील कोंडगाव, आंबवणे, चिंचोळे बु. करंजावणे, अडवली, अस्कारवाडी, केतकावाणे, कोळवडी, लाशीरगाव, मार्गासनी, खामबावाडी, मांगदरी, विंझर, वांगणी, दापोडे, चिंचाळे खु, बोरावळे, निगडे बु, मालवली, कातवडी, आंबेड, खामगाव, रांजणे.





