पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पावसाची संततधार सुरू आहे. मागील काही दिवसांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणीपातळीतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे 50 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरणात 37 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 50 टक्के म्हणजे 14.52 टीएमसी इतका झाला आहे. यंदा मान्सूनचे मे महिन्यातच आगमन झाले. पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्यातच ओढे- नाले वाहू लागल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंतच प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणातून 340 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी दिवसभरात खडकवासला धरणात 2 मिमी, पानशेतमध्ये 16 मिमी, वरसगावमध्ये 18 मिमी आणि टेमघरमध्ये 24 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरणाचे नाव – टीएमसी- टक्केवारी खडकवासला – 1.21 – 61.51 पानशेत – 4.96 – 46.56 वरसगाव – 6.99 – 54.50 टेमघर – 1.36 – 36.73 एकूण – 14.52 – 49.81