Pune : बारावीच्या पहिल्याच पेपरला सापडले ४२ कॉपी बहाद्दर; कॉपी करण्यात छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात एकुण ४२ कॉपी बहाद्दर सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपीची सर्वाधिक २६ प्रकरणे सापडली आहेत. कॉपीमुक्त अभियानाला पहिल्याच दिवशी हरताळ फासण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या बारावी, दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. मात्र तरीही राज्यातील विविध विभागांंमध्ये कॉपीच्या गैरमार्गाचे प्रकार घडल्याचे आढळून आले आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह साजरा करुनही कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.
याबाबत राज्य मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागात आठ, नाशिक विभागात तीन, नागपूरमध्ये दोन, अमरावतीत दोन, लातुरमध्ये एक याप्रमाणे परीक्षेत विभागनिहाय गैरमार्गाची प्रकरणे आढळली आहेत. मुंबई, कोल्हापूर, कोकण या तीन विभागात गैरमार्गाचे एकही प्रकरण आढळले नाही.
पेपर सुरू असतानाच विद्यार्थ्याने
दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
पुण्यात बारवीच्या विद्यार्थ्याने पेपर सुरु असतानाच दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही घटना नऱ्हे येथील जाधवर महाविद्यालयात मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी सांगितले की, आयुष जाधव( १८) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आज बारावीचा पहिला पेपर होता. हा पेपर इंग्रजी विषयाचा होता. आयुषचा नंबर वर्गातील पहिल्या बेंचवर लागला होता. प्रश्न पत्रिका वाटल्यानंतर शिक्षक उत्तर पत्रिकेला बारकोडे लावत मागे गेले होते. ही संधी साधत आयुषने गॅलरीत येऊन खाली उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. कदाचीत पेपर अवघड गेल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे.





