Pune : कागदपत्राविना कर्ज देण्याच्या अमिषाने ३९ जणांची फसवणूक
Updated On:

पुणे : महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कागदपत्रांविना १० ते १५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने ३९ जणांची १५ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात येरवडा पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. आशा उदय चौधरी (वय २७, रा. येरवडा) आणि वैष्णवी शिरीष कुलकर्णी ऊर्फ पाठक (वय २७, रा. धायरी फाटा) त्या दोघांची नावे आहेत. नोव्हेंबर २०२४ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
या प्रकरणात आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दोघींना न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कमेच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघींना १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.





