पुणे – आषाढी वारीला विठूरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून बुधवार (दि. २) पासून नियोजित बससह विशेष बस सोडण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी ३० जादा बस सोडण्यात आल्या. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या वेळापूरपर्यंत पोहोचल्या असून, पुढील दोन दिवसात या दोन्ही पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहचणार. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातून भाविकांसाठी पुणे एसटी विभागाकडून विशेष एसटी बस सोडण्यात येतात. यंदाही पुणे विभागाच्या ३२५ आणि इतर विभागांकडून मिळालेल्या जवळपास २०० बस पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन आहे. आषाढीला पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरूनगर, तळेगाव, शिरूर आणि बारामती या आगारांतील पहिल्या दिवशी एकूण ३० जादा बस सोडण्यात आल्या, तर गुरुवारी (दि. ३) या सर्व आगारांतून ४२ बस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी जादा बस सोडण्याची तयारी केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.