युतीत की आघाडीत? पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी मनसे करणार अभ्यास

पुणे – राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत विचारांचे सूर जुळलेल्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत एकमेकांना टाळी देणार का, यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ही युती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी निर्णायक ठरेल, अशी अटकळ बांधली जात असताना, मुंबई वगळता इतरत्र मात्र मनसे पदाधिकारी गोंधळात असल्याचे समोर आले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये कोणत्या पक्षासोबत युती करावी, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठोस निर्णय न घेता सर्व पर्याय तपासण्याचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती केल्यास पक्षाला किती फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना जोर असताना पुण्यात मात्र मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. राजकीय फायद्याचा अचूक अंदाज घेतल्याशिवाय कोणाशीही युती करणार नाही, असा स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मराठी मतांची विभागणी रोखण्यासाठी ठाकरे सेनेबरोबर युती उपयुक्त ठरेल, असा एक अंदाज असला, तरी त्यामुळे हिंदी भाषिक मतदार एकत्र होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका पक्षाला बसू शकतो, अशी चिंता काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे युतीच्या फायदा आणि तोट्याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय यासाठी लवकरच सर्वेक्षण केले जाणार असून, त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





