Pune : प्रभाग हद्द जाहीर होताच सोमवारी १६१ हरकती

पुणे – महापालिका प्रभाग रचनेच्या हद्दीचे राजपत्र जाहीर होताच प्रारूप प्रभाग रचनेवर सोमवारी तब्बल १४९ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. हा आकडा १६१ वर पोहचला आहे.
महापालिकेकडून २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून आजपर्यंत एकूण १६६ हरकती नोंद झाल्या आहेत. बहुतेक हरकती प्रभागांची सीमा चुकीच्या पद्धतीने आखल्याबाबत, नैसर्गिक भौगोलिक विभागणीचा विचार न केल्याबाबत आणि काही भागांमध्ये मतदारसंख्या असमतोल ठेवल्याबाबत आहेत.
सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ प्रभाग रचनेचे नकाशे जाहीर केले होते. मात्र, त्यावरून नेमका कोणता भाग प्रभागात आला आणि कोणता वगळला हे स्पष्ट होत नाही. प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात प्रभागाच्या प्रत्यक्ष हद्दीची लेखी नोंद आहे. त्यामुळे प्रभाग बरोबर झाला, की तोडफोड, हे स्पष्ट झाल्याने हरकती वाढल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक कार्यालय व स्वागत कक्षात १४९, तर १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १२ अशा मिळून १६१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदविण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.




