Pune : पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बस – अजित पवार

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बसेस दाखल होणार आहेत. मेट्रो मार्गांचा विस्तार, बाह्यवर्तुळ मार्ग, बससेवांचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पीएमपीएमएलच्या चऱ्होली बु. येथील ई-बस डेपोचे, तसेच माण ई-बस डेपोचे (ऑनलाइन पद्धतीने) उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर उपस्थित होते.
माण डेपोला ३० ई-बसेस, चऱ्होली डेपोला ६० ई-बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर उपलब्ध होणार असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, पीएमपीला बसेस घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २३० कोटी रुपये रक्कम दिली असून, त्यातून लवकरात लवकर ५०० सीएनजी बसेस घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच पुणे महापालिकेला १५० कोटी आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत. त्यातून अजून ५०० सीएनजी बसेस घेण्यात येतील. त्याव्यतिरिक्त अजून ५०० इलेक्ट्रिक बसेस जीसीसी तत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
दीपा मुधोळ- मुंडे म्हणाल्या, महामंडळाच्या सेवेत मोठ्या प्रमाणात बसेस याव्यात, यासाठी नियोजन सुरू आहे. आपली पीएमपीएमएल मोबाइल ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट बस सिस्टीम ही कंडक्टर विरहीत सेवा सुरू करण्याचा मानस ठेवला असून, सुरक्षितता आणि अपघातविरहीत सेवा हे ध्येय ठेवून पीएमपीएमएल काम करत आहे.





