Pune: आंदेकर खूनप्रकरणात आणखी १३ जणांना अटक

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आणखी १३ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी धनकवडी येथील आहेत. तसेच ते मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आहेत. यामुळे खून प्रकरणात आजवर १८ जण अटक झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला वनराज यांची बहीण संजीवनीचा पती जयंत कोमकर, दीर गणेश यांना अटक करण्यात आली. त्यानंतर संजीवनी (वय ४४), दीर प्रकाश (वय ५१, दोघे रा. नाना पेठ) आणि पसार झालेल्या सोमनाथ (वय ४१, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी, मूळ नाना पेठ) यांना अटक केली होती. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर, मंगळवारी अनिकेत दुधभातेसह १३ जणांना मानगाव जि. रायगड एमआयडीसीमधून अटक करण्यात आली. सोमनाथला अटक केल्यावर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वीस पथके मागावर होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे नीलिमा इथापे-यादव यांनी बाजू मांडली. तर, बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर पाटील, अॅड. ऋतुराज पासलकर व अॅड. आर. आर. पाटील यांनी काम पाहत आहेत.
गायकवाडने सुरू केला “समर्थ ग्रुप’
वनराजचे दाजी प्रकाश आणि गणेश कोमकर हे सोमनाथसह आंदेकर टोळीत कार्यरत होते. या तिघांचा एका गुन्ह्यात समावेश होता. त्यांना २००६ मध्ये अटकही झाली होती. दरम्यान कौटुंबिक वादांतून कोमकर हे आंदेकर टोळीपासून वेगळे झाले. आस्तित्व टिकवण्यासाठी सोमनाथ गायकवाडने करोनापूर्वी स्वत:ची टोळी स्थापन केली. तो आणि त्याच्या साथीदारांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने, त्याने टोळीला “समर्थ ग्रुप’ हे नाव दिले.
धनकवडी परिसरातून तो टोळी “ऑपरेट’ करतो. परिसरातील तरुणांना त्याने टोळीत घेतले होते. वर्चस्वाला आव्हान दिल्याने आंदेकर टोळीने गायकवाडचे साथीदार निखील आखाडेचा खून केला. यामुळे गायकवाड बदला घेण्याची संधी बघत होता. यातच त्याला कोमकर कुटुंबाची साथ मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोमकर कुटूंब प्यादे ?
आंदेकर आणि कोमकर कुटुंबात प्रचंड वाद आहेत. मात्र, प्रत्यक्षात हल्ला करताना कुटुंबातील सदस्यांचा सहभाग दिसला नाही. हल्ला गायकवाड याच्या टोळीने केला. मात्र, सूर्यकांत (बंडू) आंदेकर याच्या फिर्यादीनुसार कोमकर कुटुंबालाही आरोपी करण्यात आले आहे. सूर्यकांत आंदेकर याने स्वत:ची मुलगी आणि जावयाविरुद्ध तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांना अद्यापही बहिणी कौटुंबिक वादातून भावाचा जीव घेतील का ? याची शंका वाटत आहे. यामुळे पुढील काही दिवसांत आंदेकर खून प्रकरणी वेगळीच काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
आंदेकरांवर पाळत
वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवून आराेपींनी खून केल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात वनराज हे दररोज सायंकाळी थांबतात, याची माहिती आरोपींना होती. संजीवनीने आरोपींना चिथावणी दिली होती. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, तसेच पसार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकिलांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.





