पुणे : तलाठी परीक्षेतील उमेदवारांना १४६ प्रश्नांसाठी १०० टक्के गुण

– भूमि अभिलेख विभागाचा निर्णय
पुणे – तलाठी परीक्षेची उत्तर तालिका अर्थात आन्सर की उपलब्ध करून देण्यात होती. यामध्ये प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्यास आक्षेप अथवा हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार 2हजार 831 प्र्श्नांवर 16हजार 203 आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले.
या आक्षेपांपैकी एकूण १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९ हजार ७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे १०० टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत. तर उर्वरित ३२ प्रश्नांच्या उत्तरसूचीमध्ये देण्यात आलेले उत्तर चुकीचे होते, त्यामुळे योग्य उत्तर देणाऱ्यांना गुण देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४ हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती.




