Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान अपघात! रनवे ओलांडून पुढे घसरले विमान…काय घडलं नक्की?
Baramati Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या; बारामतीत पुन्हा एकदा विमानाचा अपघाताने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

Baramati Plane Crash – बारामतीविमानतळावर रविवारी (दि.९) दुपारी एका खासगी कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सरावादरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील ट्रेनी पायलट आणि प्रशिक्षक दोघेही सुरक्षित आहेत. विमानाचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी बारामती विमानतळाच्या परिसरात, रनवेपासून काही अंतरावर घडली. विमानाने सकाळी (०६:३९ UTC) उड्डाणाच्या सरावासाठी ‘लिंक ब्राव्हो’मार्गे रनवेवर प्रवेश केला होता. विमानाने प्रथम रनवे २९ च्या थ्रेशोल्डवरून उड्डाण रद्द (Rejected Take-off) करण्याचा सराव केला.
त्यानंतर रनवे ११ वरून पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्याचा सराव करण्यात आला.सरावादरम्यान वेग नियंत्रित न झाल्यामुळे विमान धावपट्टीवर वेळेत पूर्णपणे थांबवता आले नाही. त्यामुळे विमान रनवे २९ ची हद्द ओलांडून पुढे गेले धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने सुरक्षा उपकरणांमुळे आणि प्रसंगावधानामुळे विमानातील दोघेही सुरक्षित बाहेर पडले. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मे २०२६ मध्ये झालेली क्रॅश लँडिंग
यापूर्वी १३ मे २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळील गोजुबाबी गावाच्या हद्दीत ‘रेडबर्ड’ (Redbird) कंपनीचे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले होते. कॅश लँडिंगदरम्यान, जमिनीवर आदळण्यापूर्वी विमानाचा काही भाग एका विजेच्या खांबाला धडकला होता. त्यावेळी विमानात केवळ एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
अजितदादांच्या आठवणी
दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये याच बारामती विमानतळावर चार्टर विमान कोसळून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अजित पवार या विमानातून मुंबईहून बारामतीला येत होते. लँडिंगदरम्यान, विमानाचा भीषण अपघात झाला. त्या घटनेत प्राण गमावलेल्या इतरांमध्ये कॅप्टन सुमित कपूर (ज्यांना १५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता)
आणि सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक (१,५०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता) यांचा समावेश होता. विमानात पवारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे देखील होते. अपघातास कारणीभूत ठरलेले ‘लिअरजेट ४६’ (Learjet 46) हे विमान दिल्लीस्थित ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) या कंपनीद्वारे चालवले जात होते.





