Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी १०० टक्के जागा ताब्यात

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईनचा २३ किलोमीटरचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्राधिकरणामार्फत एकूण आवश्यक जागांपैकी १०० टक्के जागा मेट्रो कंपनीस उपलब्ध करून दिली आहे.
मेट्रो लाईन – ३ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने शासनाच्या मान्यतेने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांच्यासोबत सवलत करारनामा केला आहे. यानुसार मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व जागा मेट्रो प्रकल्प बांधकामासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाने आवश्यक जागा मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राजभवन, पुणे आवारातील पुणे विद्यापीठ बाजूकडील २६३.७८ चौ.मी. जागा जिना बांधकामासाठी आवश्यक होती. संबंधित जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत राजभवन कार्यालयास नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर केला होता.
त्यानुसार मेट्रो जिन्यासाठी आवश्यक असलेली २६३.७८ चौ. मी. जागा हस्तांतरित करण्यास राजभवन कार्यालयाने मान्यता दिली आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पास आवश्यक असलेली १०० टक्के जागा प्राधिकरणाच्या ताब्यात आली आहे.




