इंग्लंड दौऱ्यापूर्वी पुजारा फॉर्मात ; काऊंटी क्रिकेटमध्ये झळकावले सलग 3 शतके

मुंबई – भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे.गेल्या 15 दिवसांमध्ये पुजाराने 3 वेळा शंभरी ओलांडली असून एकदा द्विशतक झळकावत संघाचा पराभव टाळला आहे.
पुजाराला खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर आयपीएल 2002 पूर्वी झालेल्या ऑक्शनमध्येही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्यानंतर पुजाराने इंग्लंडमध्ये जाऊन कांऊटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. पुजाराच्या शतकामुळे ससेक्सने डरहमच्या विरूद्ध निर्णायक आघाडी घेतली आहे. चार दिवसांच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस शुक्रवारी खेळ समाप्त होईपर्यंत ससेक्सने पहिल्या डावात 5 बाद 362 धावा उभारल्या ओहत. डरहमचा पहिला डाव 223 धावांत गुंडाळला आहे. त्याला उत्तर देताना ससेक्सकडे 139 धावांची भक्कम आघाडी आहे.
पुजाराने 198 चेंडू खेळताना नाबाद 128 धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने 16 चौकारही मारले.या शतकी योगदानामुळे ससेक्सने दुसऱ्या दिवसाखेर 5 बाद 362 धावा धावफलकावर लावल्या आहेत. दरम्यान, भारतीय संघ जुलै महिन्यांत इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी पुजाराने आपली दावेदारी भक्कम केली आहे. या सामन्यासाठी संघाची निवड करताना पुजाराने इंग्लंडमध्ये केलेल्या खेळींकडे निवड समितीला दुर्लक्ष करता येणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणेसह पुजाराची हकालपट्टी करण्यात आली होती.





