S Venkatraman : क्रिकेट विश्वात खळबळ! संघात निवड न झाल्याचा राग; पुदुचेरीच्या ३ खेळाडूंनी बॅटने फोडलं कोचचं डोकं

मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंनी वेंकटरमन यांना इतके मारले की त्यांचे डोके फुटले, तसेच त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्या डोक्यावर २० टाके पडले असून, संपूर्ण शरीरावर मार लागला आहे. सेडारापेट पोलीस स्टेशनचे सब-इन्स्पेक्टर एस. राजेश यांनी माहिती दिली की, आरोपी खेळाडू कार्तिकेन, अरविंदराज आणि संतोष कुमार फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
निवड न झाल्याच्या रागातून हल्ला –
वेंकटरमन यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संघात निवड न झाल्यामुळे नाराज असलेल्या या तिन्ही खेळाडूंनी त्यांच्यावर हल्ला केला. ते खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांनी प्रथम शिवीगाळ केली आणि नंतर बॅटने हल्ला केला. या हल्ल्यामागे भरथिदासन पुदुचेरी क्रिकेटर्स फोरमचे सचिव जी. चंद्रन यांचा हात असल्याचा आरोपही वेंकटरमन यांनी केला आहे.
हेही वाचा – Blair Tickner : धक्कादायक! न्यूझीलंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत, क्षेत्ररक्षण करताना खांदाच निखळला
स्थानिक फोरमने फेटाळले आरोप –
पुदुचेरी क्रिकेटर्स फोरमचे अध्यक्ष सेंथिल कुमारन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले की, वेंकटरमन यांच्यावर अनेक जुने गुन्हे आहेत आणि ते अनेकदा स्थानिक क्रिकेटपटूंशी गैरवर्तन करतात. तसेच, चंद्रन यांच्याशी त्यांचे वैर सार्वजनिक आहे.
सीएपी मधील भ्रष्टाचाराचे प्रकरण –
ही घटना अशा वेळी समोर आली, जेव्हा इंडियन एक्सप्रेसने सीएपी मधील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात ‘बाहेरील खेळाडूंना’ बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थानिक दाखवून संधी दिली जात असल्याचे उघड झाले होते, ज्यामुळे पुदुचेरीतील मूळ खेळाडूंना संधी मिळत नव्हती.
बीसीसीआय करणार चौकशी –
या प्रकरणाची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, हे आरोप गंभीर असून बोर्ड लवकरच याची चौकशी करेल. सीएपीने मात्र या वादावर थेट भाष्य करणे टाळले आहे.





