चाकणमध्ये ‘ज्ञानेश्वरी काव्यार्थ’ ग्रंथाचे प्रकाशन

चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद (चाकण शाखा) आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघजाईमाता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथील वाघजाईनगरमध्ये आयोजित चारदिवसीय संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांच्या ‘ज्ञानेश्वरी काव्यार्थ’ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात कथाकार ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी ज्ञानेश्वर भक्ती कथनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे, खेड-आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, शिवसेना (उबाठा) गटाचे उपतालुकाप्रमुख रामदास धनवटे, प्राध्यापिका व कवयित्री शालिनी सहारे, तात्याकाहेब कड, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानेश्वरीच्या ९०३४ ओव्या काव्यात –
कवी ज्ञानेश्वर शांताबाई शिळवणे यांनी सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरी समजावी यासाठी ग्रंथातील ९०३४ ओव्यांचा अर्थ काव्यरूपात गुंफून १२८४ कवितांचा हा ग्रंथ साकारला. “नऊ वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, माऊलींवरील निस्सीम भक्ती आणि साधनेमुळे हे शक्य झाले,” अशी भावना शिळवणे यांनी व्यक्त केली. यावेळी संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि स्वतः गायलेल्या शिळवणे यांच्या पसायदानावरील गीताचे लॉन्चिंगही झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले. या सोहळ्याला साहित्यप्रेमी आणि भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





