Public Safety – शहरातील राव कॉलनी परिसरातील उद्यानात गेल्या आठ दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माकडाच्या सततच्या वावरामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. भंडारी हॉस्पिटलच्या पाठीमागील राव कॉलनी भागात असलेल्या उद्यान परिसरात हे माकड सतत दिसत आहे. उद्यानातील झाडांवरून इकडून तिकडे उड्या मारणे, घरांच्या गच्चींवर जाऊन बसणे, तसेच परिसरात मुक्तपणे वावरणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे लहान मुले मोठ्या प्रमाणात उद्यानात खेळण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेत झाडांच्या सावलीत बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिला देखील येथे येतात. मात्र माकडाच्या उपस्थितीमुळे त्यांना भीतीच्या छायेत वेळ घालवावा लागत आहे. काही वेळा हे माकड रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांच्या हातातील पिशव्या किंवा खाद्यपदार्थ हिसकावून घेत असल्याचे प्रकारही घडले आहेत. परिसरातील घरांच्या गच्चींवर जाऊन बसणे, आंब्याच्या झाडांवरील फळे खाणे आणि अचानक लोकांसमोर येणे यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. माकडाच्या अनियमित हालचालींमुळे अपघात किंवा इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन आणि वनविभागाने तातडीने हस्तक्षेप करून या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण महत्त्वाचे असले, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेलाही तितकेच प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.