धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ (घटस्थापना) ते गुरुवार, दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती, तसेच त्यांचा सन्मान सोहळादेखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ (घटस्थापना) सकाळी ९.०० वाजता गोपालराजे पटवर्धन, पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. वंदे मातरम गीताला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यावर स्वतंत्र कार्यक्रम पहिल्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल.
याशिवाय दहा दिवसांत श्रीसूक्त अभिषेक, श्रीविष्णु सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रमदेखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
याशिवाय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी सामूहिक महिला व पुरुष यांच्यासाठी श्रीसूक्त पठण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादन सेवा, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर, तसेच स्टार्टअप्स यांचा सन्मान, लेखिका कवयित्री सन्मान, कन्यापूजन, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
यावर्षी नारी तू नारायणी हे पुरस्कार कु. पूजा मिसाळ, श्रीमती मीरा बडवे आणि सिस्टर ल्यूसी कुरियन यांना देण्यात येणार आहेत. २३ तारखेला सायंकाळी डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंजिरी भालेराव यांच्या शुभहस्ते होणार आहे. २४ तारखेला करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु विद्या नरसिंह स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत.
२४ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. २५ तारखेला महिला लष्करी अधिकारी यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भजन, पारंपरिक नृत्य, सामूहिक गरबा आणि प्रतीकात्मक रावणदहन कार्यक्रम ही यंदाची वैशिष्ट्ये असणार आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
दसऱ्याच्या दिवशी गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता हळदीकुंकू व ओटीचा कार्यक्रम होणार आहे, तर रात्री ९.३० वाजता रावणदहन कार्यक्रम होणार आहे. उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत.
तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा घेण्यात आला आहे व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५०हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, विशेष म्हणजे या वर्षी दिव्यांग बांधवांसाठी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याद्वारे त्यांचे दर्शन सुखकर करण्याचा मंदिराच्या व्यवस्थापनाने प्रयत्न केलेला आहे तसेच राष्ट्रीय गीत वंदे मातरम्’ याच्या १५० वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे.
तरी या नवरात्र उत्सवात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.





