पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक असलेल्या पुण्यात आजवर ठोस सांस्कृतिक धोरण आखले गेलेले नाही, ही खंत विविध सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत मंडळींनी व्यक्त केली आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला धक्का बसत आहे. त्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला बळकटी मिळावी, यासाठी तातडीने पुणे शहर सांस्कृतिक धोरण जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुण्यातील नाट्यगृहांचा इतिहास, वाचनसंस्कृती, संगीत- महोत्सव, नृत्यकला, चित्रकला, वाङ्मय परंपरा आणि संत साहित्यामुळे पुण्याला विशेष स्थान लाभले आहे. मात्र, शहरातील नाट्यगृहे जीर्णावस्थेत आहेत, वाचनालये निष्क्रिय होत आहेत, नवोदित कलाकारांना सरावासाठी अल्पदरात हॉल मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कलाकारांना शाश्वत प्रोत्साहन मिळत नाही, सांस्कृतिक उपक्रम व संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांना पाठिंबा मिळत नाही आणि नवी पिढी कला-संस्कृतीकडे वळावी, यासाठी ठोस कार्यक्रमही आखले जात नाहीत. पुण्यासारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध शहरासाठी सांस्कृतिक धोरण असणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा धोरणाद्वारे कलाकारांसाठी अनुदान, मानधन व विमा योजना राबविणे, सार्वजनिक नाट्यगृह, वाचनालये व संग्रहालयांचे आधुनिकीकरण करणे, शाळा-महाविद्यालयांत संस्कृती विषयक प्रबोधन करणे आणि वारसा जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे शक्य होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.