पुणे | पब संस्कृतीला बड्या अधिकाऱ्यांचाच वरदहस्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कायदा सुव्यवस्था आणि शहराचे सामाजिक भान, दीर्घक़ालीन धोरणांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी असलेल्या उच्चपदस्थ अधिकारी तसेच राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत शहरात पब संस्कृती अक्षरश: बोकाळली आहे. त्याची अनेक उदाहरणे शहरभर अनेकदा दिसून येतात.
मात्र, मोठ्र्य साहेबांचा आश पब चालकांकडून बाॅलीवूडच्या बड्या कलाकारांचे काॅन्सर्ट, पेज र्थी पार्टी, दिवाळी पार्टी, नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टींज् आयोजित करून पैसे कमावले जातात. अशा वेळी नियमांच्या उल्लंघनामुळे होणाऱ्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी या मोठ्या अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हजारो रुपयांची व्हीआयपी तिकिटे मोफत दिली जातात.
अशा अधिकाऱ्यांचे काही “हस्तक’ शहरात असून त्यांंच्या माध्यमातून हे नियोजन केले जाते. त्यामुळे काहीही झाले तरी, आपल्यावर कारवाई होणार नाही याची खात्री असल्याने शहरात पब संस्कृती वाढलेली असल्याचे चित्र आहे.
शहराचा उच्चभ्रू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात आतापर्यंत पब संस्कृती होती. मात्र, त्या सोबतच आता कल्याणीनगर, मुंढवा, घोरपडी, खराडी, विमाननगर भागातही पब आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे हाॅटेल वाढले आहेत. मात्र, त्यांनी नियमबाह्य कामे केली, तरी केवळ मोठे अधिकारी आणि राज्यातील बडे नेते त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
काही महिन्यांपूर्वी शहरातील अशाच एका पब चालकाने हिंजवडी येथे एका गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास राज्यातील एका बड्या नेत्याचे नातेवाईक तसेच शहरातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे कुटूंब हजर होते. या कार्यक्रमामुळे हिंजवडी भागात जवळपास तीन ते साडेतीन तास वाहतूक कोंडी झाली. मात्र, आयोजकांवर कारवाईचा साधा चकार शब्दही काढण्यात आला नव्हता.
पार्टीला नियमित हजेरी
शहरातील काही पब चालकांकडून शनिवार, रविवार, नवीन वर्ष, नाताळ , दिवाळी या कालावधीत मोठमोठ्या पार्टीचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी हे अधिकारी नियमित हजेरी लावतात. त्यानंतर आयोजक स्वत: हे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
तर नंतर हेच पबचे चालक मालक हे फोटो संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या खालच्या अधिकाऱ्यांंना पाठवतात. त्यामुळे आपल्याच साहेंबावर कारवाई कशी करणार, या भीतीने बेकायदेशीर पबवर कारवाई करण्यास टाळाटाळ होते.





