Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; तब्बल ‘इतके’ राजकीय पक्ष ठरले अपात्र

Election Commission – भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी ३३४ नोंदणीकृत राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. २०१९ पासून आतापर्यंत गेल्या सहा वर्षांत एकही निवडणूक लढवण्याचे आवश्यक निकष या पक्षांना पूर्ण करता आले नाहीत.
याशिवाय, या पक्षांची कार्यालये त्यांच्या नोंदणीकृत कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर देखील उपस्थित नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाने अशा सर्व पक्षांची मान्यता काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने म्हटले आहे की, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व तथ्ये आणि शिफारसींचा विचार केल्यानंतर, यादीतून हे पक्ष वगळले आहेत. आता, एकूण २८५४ पक्षांपैकी २५२० पक्ष शिल्लक आहेत. सध्या निवडणूक आयोगाकडे सहा राष्ट्रीय पक्ष, ६७ राज्यस्तरीय पक्ष आहेत.
निवडणूक आयोगाच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखादा पक्ष सलग ६ वर्षे निवडणूक लढवत नसेल, तर तो पक्ष नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून काढून टाकला जातो. हे रद्द झालेले पक्ष आता लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २९ बी आणि कलम २९ सी च्या अधीन असतील. हे पक्ष निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ च्या तरतुदींनुसार कोणताही लाभ मिळविण्यास पात्र राहणार नाही.
३० दिवसांच्या आत आक्षेप नोंदवा
निवडणूक आयोगाने असेही म्हटले आहे की जर कोणत्याही पक्षाला या आदेशाबद्दल काही अडचण असेल तर तो ३० दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करू शकतो. निवडणूक आयोग अशा पक्षांना काढून टाकत आहे, जे आता जनतेच्या संपर्काच्या बाहेर आहेत.
ते फक्त कागदावरचे अस्तित्व टिकवून आहेत. जून २०२५ मध्ये, निवडणूक आयोगाने सफाई अभियान सुरू केले. यासह, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना वरील अटींचे पालन करण्याबाबत ३३५ आरयूपीपींची पडताळणी तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.





