अकोल्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांची आत्महत्या; परिसरात खळबळ

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे ही घटना आणखी धक्कादायक समजली जात आहे.
दरम्यान, सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मुसळेविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोप पत्रात अटकेतील आरोपी मनीषा मुसळेने डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.





