तारीख पर तारीख..! न्याय न मिळाल्याच्या नैराश्यातून जेष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून ६१ वर्षीय जेष्ठ नागरिकाने बुधवारी (दि.१५) सकाळी शिवाजीनगर न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. १९९७ सालापासून जमीनविषयक वाद सुरू होता. तेव्हापासून आजवर ही केस न्यायप्रविष्ट होती, मात्र दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू असूनही त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे ते तणावाखाली होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली.
बुधवारी (दि.१५) सकाळी नामदेव जाधव हे शिवाजीनगर येथील न्यायालयात आले. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने जाधव यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





