भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान ! जम्मू-कश्मीर निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई – लोकशाही आपल्या देशामध्ये किती मजबूत आहे, हे जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांवरुन स्पष्ट होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही सैन्याच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवले असल्याचा प्रचार पाकिस्तान जगभरात करत होता.
मात्र, आता जगभरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील निकालावर त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 काढल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असा दावा काही लोक करत होते. मात्र आता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा निकाल चांगला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. भारतीय संविधानाने हे करून दाखवले असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे
पाकिस्तानचा जगभरात केलेला प्रोपोगंडा आता संपला आहे. आता त्या ठिकाणी निवडणूक होऊन लोकशाही पद्धतीने सरकार निवडून आले आहे. आता लोकशाही सरकार जम्मू-काश्मीरमध्ये सरकार चालवणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
जगभरातील अनेक देशातील प्रमुख नेते जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांनी आता सर्व लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पाहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्रभाव आता संपला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.





