बेलग्रेड (सर्बिया) – सर्वबियाच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा सरकारविरोधी निदर्शकांनी आंदोलन करायला सुरुवात केली असून काही शहरांमध्ये ठिकठिकाणची वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई करत ७९ जणांना ताब्यात घेतले आहे. अध्यक्ष अलेक्सांदर वुसिक यांच्या लोकप्रिय सरकारपुढे या आंदोलनाने एक मोठे आव्हान उभे केले आहे. राजधानी बेलग्रेडमध्ये बुधवारी संध्याळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याशिवाय बेलग्रेडच्या उत्तरेकडील नोवी साद आणि दक्षिणेकडील निस आणि नोवी पझार शहरांमध्येही अशी आंदोलने झाली. या आंदोलनामागे विद्यापीठातील विद्यार्थी संघटना असल्याचा आरोप पोलीस प्रमुखांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये ४ विद्यार्थी जखमी झाले, असे साक्षीदारांनी म्हटले आहे. सर्बियामधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सर्बियातील युरोपीय संघाचा दूतावास आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने सांगितले. या दोघांनीही तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस यंत्रणेने आंदोलकांवर कारवाई करताना संयम बाळगावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. देशात संसदेच्या मुतपूर्व निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी शनिवारी विराट मोर्चा काढला गेला होता. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. तसेच सरकार समर्थक आणि विरोधी गटांमध्येही जोरदार संघर्ष झाला होता. तब्बल ८ महिन्यांपासून सरकारविरोधी आंदोलन सुरू असले तरी अध्यक्ष वुसिक यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याची मागणी फेटाळली आहे. सर्बियामध्ये २०२७ साली संसदेच्या निवडणुका होणार आहेत.