Pakistan petrol price : पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन पेटले
देशाच्या चारही प्रांतांच्या राजधान्यांमध्ये १६ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे जमात-ए-इस्लामी पाकिस्तानने म्हटले आहे.

Pakistan petrol price – पाकिस्तानात पेट्रोलच्या प्रचंड वाढलेल्या किंमतींच्या विरोधात जमात-ए-इस्लामी पाकिस्तानने आंदोलनाचा इशारा दिला आहे. देशाच्या चारही प्रांतांच्या राजधान्यांमध्ये १६ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे जमात-ए-इस्लामी पाकिस्तानने म्हटले आहे.
सध्या पाकिस्तानमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ३३० पाकिस्तानी रुपये इतकी आहे. पेट्रोलवरील अवाजवी कर मागे घेऊन किंमत प्रति लिटर २२५ पाकिस्तानी रुपयांपर्यंत खाली आणावी, अशी मागणी जमात-ए-इस्लामी पाकिस्तानने पाक सरकारकडे केली आहे.
मागणीसाठी लाहोर, सिंध आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री आणि खैबर पख्तुनख्वाच्या राज्यपालांच्या घरांसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा जमात-ए-इस्लामी पाकिस्तानचे प्रमुख हाफीज नाईमूर रेहमान यांनी दिला आहे.
पेट्रोलियम उत्पादनांवर वारेमाप कर लादल्याबद्दल शहबाज शरीफ सरकारच्या विरोधात जमात-ए-इस्लामी पाकिस्तानने या आठवड्यात लाहोर, कराची आणि इस्लामाबादसह देशभरात मोर्चे देखील काढण्यात आले होते.





