Maratha Reservation : आंदोलक गाडीतून देशी दारू आणतात; गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत.
आंदोलनामुळे सीएसएमटी, बीएमसी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. यादरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मोठा आरोप केला आहे. त्यांनी, मराठा आंदोलकांसमोर पोलीस हेल्पलेस असून मुंबई दाखल होताना आंदोलक देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा दावा केला आहे. तर हे थांबवण्यासाठी न्यायालयाने कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, “सीएसएमटी परिसर अत्यंत संवेदनशील आहे. येथे महत्वाची कार्यालये, रुग्णालये आहेत. आंदोलनामुळे सामान्यांना प्रचंड त्रास होतोय.” ते म्हणाले की, कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन होत असून, हे आंदोलन कायद्याच्या सीमा ओलांडत आहे. सदावर्ते यांनी पोलिस महासंचालकांकडेही तक्रार दाखल केली असून, राजकीय पाठिंब्यामुळे परिस्थिती बिघडली आहे, असा आरोप केला.
आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.





